श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्र महोत्सव: सहावी माळ. श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक तुळजाभवानी माता पोषाखासह अलंकार परिधान,
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) घटस्थापनेपासून नवरात्र महोत्सवास सुरवात होत आहे. या निमित्त दुपारी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे सहाव्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये रूक्मिणी मातेस तुळजाभवानी माता पोषाख परिधान करण्यात आला असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, कौस्तुभ मणी, दंडपेठ्या जोड, हिऱ्यांचा कंगनजोड, नाम इमिटेशनचा, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी, शिरपेच, मत्स जोड, तोडे जोड, जवेची माळ, तांदळया हार, एकदाणी, तुळशीची माळ, हायकोल , सूर्यकळ्याचा हार तसेच रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, जडावाचा हार, खड्याची वेणी, पाचूची गरसोळी, हिरवी चिंचपेटी, पावड्याचा हार, दशावतारीहार, ठूशी, लहान सरी, सोन्या मोतीची तानवड जोड, सूर्य, पेट्याची बिंदी, मन्यामोत्याच्या पाटल्या जोड, सोन्याचे बाजूबंद जोड, मत्स्य जोड, रुळजोड, पैंजणजोड, मोठी नथ, कर्णफुले जोड, तारामंडल अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.तसेच राधिका मातेस नक्षी मुकुट, मोहरांची माळ, तांबडी चिंचपेटी, जव्याची माळ, हायकोल व सत्यभामादेवीला नक्षी टोप, लक्ष्मी हार, जवमनी पदक, जवेची माळ, पुतळ्याची माळ इत्यादी अलंकार व प्रथा परंपरेप्रमाणे पोशाख परिधान करण्यात आलेले आहेत.

तसेच मंदिर समितीच्या अख्त्यातरीत असलेल्या पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई, अंबाबाई, पद्मावती, यल्लमादेवी, यमाई-तुकाई माता आदी परिवार देवतांना देखील पारंपारिक पोषाख करण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.