श्रीपुर च्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास देशपातळीवर प्रथम क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार जाहीर , कारखाना कार्यक्षेत्रातील कामगार, सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण, विक्रमी ऊस गाळपात माढ्याचा विठ्ठलराव शिंदे कारखाना प्रथम, राज्यातील १० कारखाने अव्वल, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची घोषणा

श्रीपुर च्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास देशपातळीवर प्रथम क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार जाहीर ,   कारखाना कार्यक्षेत्रातील कामगार, सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण,   विक्रमी ऊस गाळपात माढ्याचा विठ्ठलराव शिंदे कारखाना प्रथम,  राज्यातील १० कारखाने अव्वल,   राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची घोषणा

------------------------------------------------------------------------------------

श्रीपुर (दै पंढरी नगरी न्युज) माळशिरस तालुक्यातील श्रीपुर येथील सुधाकरपंत परिचारक श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास देश पातळीवरील देण्यात येणारा प्रथम क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार मिळाला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन तथा माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली .राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी साखर कारखान्यांसाठी जाहीर केलेल्या २१ पुरस्कारांत महाराष्ट्राने १० पारितोषिके मिळवून प्रथम क्रमांक देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यासाठीचे मानाचे वसंतदादा पाटील पारितोषिक आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला मिळाले आहे. पारितोषिक वितरण सोहळा ऑगस्टमध्ये होणार आहे.

महासंघातर्फे दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते व त्याआधारे ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, जास्तीजास्त ऊसगाळप, सर्वोत्तम साखर उतारा, सर्वात जास्त साखर निर्यात अशा विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांचे काटेकोर मूल्यमापन करून त्याआधारे पारितोषिके जाहीर करण्यात येतात. केंद्रीय मुख्य संचालक (साखर) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने २०२२-२३ साठीची २१ पारितोषिके महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केली. या वेळी महासंघाचे व्यस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.

या स्पर्धेत महाराष्ट्रातील ३८, उत्तर प्रदेश ११, गुजरात ११, तमिळनाडू १०, पंजाब ८, हरयाणा ८, कर्नाटक ४ आणि मध्य प्रदेश व उत्तराखंड प्रत्येकी एका कारखान्याने अशा एकूण ९२ कारखान्यांनी सहभाग घेतला. यात देशातील उच्च साखर उतारा (किमान सरासरी १० टक्के) असणाऱ्या महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या राज्यांचा एक गट तयार करण्यात आला. या गटात देशातील एकूण ५३ सहकारी साखर कारखान्यांचा सहभाग होता. उर्वरित (सरासरी १० टक्क्यांपेक्षा कमी उतारा) राज्यांचा दुसरा गट तयार करण्यात आला. या गटात देशातील एकूण ३९ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश करण्यात आला. त्यात उत्तर प्रदेश, पंजाब, तमिळनाडू, हरयाणा, मध्य प्रदेश, उत्तराखंड इत्यादी राज्यांचा समावेश करण्यात आला होता.