मंगळवेढयात ऑनलाईन केंद्रामधून सर्व्हर कासव गतीने चालत असल्याने विविध दाखल्यांना होतोय विलंब,महिला वर्गातून संताप

मंगळवेढयात ऑनलाईन केंद्रामधून सर्व्हर कासव गतीने चालत असल्याने विविध दाखल्यांना होतोय विलंब,महिला वर्गातून संताप

------------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा(दै.पंढरी नगरी न्यूज ) :- मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील ऑनलाईन केंद्रामधून सर्व्हर धिम्म गतीने चालत असल्याने विदयार्थी व महिलांना विविध दाखल्यांसाठी दिवस दिवस प्रतिक्षा करण्याची वेळ आली असून शासनाने याकामी गांभिर्यपूर्वक लक्ष घालून सर्व्हरची गती वाढवून विविध दाखले विदयार्थ्यांना तात्काळ मिळण्याची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.दरम्यान, शासनाने नुकतीच महिलांसाठी माझी लाडकी बहिण ही योजना आणल्याने त्यासाठी लागणारे दाखले काढण्यासाठी सर्वच ऑनलाईन केंद्रावर महिलांची तुफान गर्दी पहावयास मिळत असल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्र शासनाने महिला वर्गासाठी दि.1 जुलैपासून लाडकी बहिण या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची योजना आखली आहे.या योजनेसाठी लागणारे विविध दाखले काढण्यासाठी ऑनलाईन केंद्रावर भाऊ गर्दी होत आहे.त्याचबरोबर शाळा,महाविदयालये यांच्या प्रवेशासाठी मुला मुलींना लागणारे विविध दाखले मिळविण्यासाठी तुफान गर्दी होत असताना ऑन लाईन केंद्रातील सर्व्हर दिवसभर कासवगतीने सुरु असल्याने महिला वर्गाना व शालेय विदयार्थ्यांना दिवसभर तिष्ठत बसावे लागत आहे.परिणामी सर्व्हरच्या धिम्म गतीमुळे तीव्र संताप व्यक्त होत असून वेळेत दाखलेही मिळत नसल्याने ही योजना कागदपत्राअभावी हातची जाते की काय अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.

मागील वर्षीही जून-जुलैमध्ये सर्व्हर धिम्म गतीने चालू असल्यामुळे असाच प्रश्‍न उदभवला होता.येथील तहसीलदार यांनी मुंबईच्या सर्व्हर ऐवजी दिल्लीचे सर्व्हर जोडण्यासाठी ऑनलाईन पत्र पाठवून ते जोडल्याने दाखले देण्यास गती आली होती. याच धर्तीवर महसूल प्रशासन अधिकार्‍यांनी प्रयत्न करून विदयार्थी व महिलांना न्याय दयावा,राज्याचे मुख्यमंत्री यांनीही या कामी लक्ष घालून धिम्या गतीने चालणार्‍या सर्व्हरला गती देवून येथील प्रश्‍न तात्काळ सोडवावा अशी मागणी होत आहे.दरम्यान दिवसभर सर्व्हरला गती नसल्यामुळे ऑनलाईन केंद्रचालक रात्रीच्यावेळी उशीरापर्यंत थांबून दाखले काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.