श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळा.. अहमदनगर जिल्ह्यात दाखल प्रशासनासह ग्रामस्थांनी केले जंगी स्वागत.
------------------------------------------------------------------------------------
अहमदनगर( दै.पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यासाठी शुक्रवारी रोजी प्रस्थान झालेल्या श्रीसंत एकनाथ महाराज सोहळ्याचा पहिला मुक्काम चानकवाडी येथे संपन्न झाल्यानंतर शनिवारी दि.२९ रोजी दुपारी सोहळा अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीत दाखल झाला. यावेळी प्रशासनासह ग्रामस्थांनी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची जंगी स्वागत केले आहे.
संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याची पहिला मुक्काम चनाकवाडी पंचक्रोशीत झाला या परिसरातील भाविकांनी नाथांच्या पवित्र पादुकांचे पूजन करून दर्शनाचा लाभ घेतला. या सोहळ्याच्या मुक्कामामुळे या गावाला यात्राचे स्वरूप निर्माण झाले होते. शनिवारी रोजी सकाळी चानकवाडी ग्रामस्थांचा निरोप घेऊन हा सोहळा पाटेगाव मार्गे मार्गस्थ झाला. यावेळी तालुका हद्दीचा बंदोबस्त पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरुकुल यांनी केला. दुपारी १२ वाजेच्या दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील मुंगी ता. शेवगाव या पंचक्रोशीत नाथांचा सोहळा दाखल झाला.
यावेळी अहमदनगर महसूल विभागाचे प्रांत अधिकारी प्रमोद मते, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, शेवगावचे तहसीलदार प्रशांत संगडे, पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम, सहाय्यक गटविकास अधिकारी अभिजीत बांगर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ,लोणकर, पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पालखी सोहळ्याचे प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत अंबिलवादे, मुंगीचे सरपंच ललिता ढमढेरे, उपसरपंच वंदना घोटाळे, ग्रामविकास अधिकारी रमेश राठोड, तलाठी लोहोकरे, नितीन मोरे, राजेंद्र ढमढेरे, भाऊसाहेब घोटाळे, प्रवीण बल्लाळ,माऊली गव्हाणे, अमोल गव्हाणे यांच्याहस्ते नाथांच्या पादुका पूजन करून पालखी प्रमुख ह.भ.प नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले, योगेश महाराज गोसावी पालखीवाले व सोहळ्यातील सहभाग महाराज मंडळी व वारकऱ्यांची स्वागत केले.
नाथांच्या पवित्र पादुका मुंगी पंचक्रोशीत दाखल झाल्यामुळे गावकऱ्यांनी मिरवणूक काढून ठिकठिकाणी वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करून रांगोळी काढल्या ढोल ताशा लेझीम पथकसह फटाक्याच्या आतिषबाजी करून जंगी स्वागत केले. दुपारचा भोजन विसावा मुंगी पंचक्रोशीत घेतल्यानंतर सायंकाळी दुसऱ्या मुक्कामासाठी हातगाव ता. शेवगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी सोहळ्याचे वाजत गाजत सायंकाळी आगमन झाले.
सोहळ्याचा तिसरा मुक्काम आज दि.३० रोजी श्रीसंत भगवान बाबा यांच्या गडाच्या पायथ्याशी असलेल्या पारगाव या ठिकाणी होणार आहे.