भाजप नेत्यांना जबाबदार धरत ऐका महिलेचा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न ; सांगाेला येथील प्रकार.....!

भाजप नेत्यांना जबाबदार धरत ऐका  महिलेचा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न ; सांगाेला येथील प्रकार.....!

---------------------------------------------------------------------------------

साेलापुर (पंढरी नगरी न्यूज) : सांगोला तालुक्यातील जवळा येथील भाजपाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासोबत एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला. या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी पीडित महिलेविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. त्यामुळे पीडित महिलेने आज सांगोला पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पीडित महिलेने भाजप नेते, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माढय़ाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, श्रीकांत देशमुख यांचे भाऊ, यांच्यासह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना यासाठी जबाबदार धरले आहे.

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांची पत्नी असल्याचा दावा पीडित महिला गेल्या दीड ते दोन वर्षांपासून करत आहे. श्रीकांत देशमुख यांच्याकडून फसवणूक झाल्याचा आरोप करत महिलेने बेडरूममधील झालेल्या मारहाणीबाबत व्हिडीओ व्हायरल करून न्यायाची मागणी केली आहे. याबाबत पोलिसांतही तक्रार दाखल केली असून, दबावामुळे कारवाई थंडावल्याचे चित्र आहे. दरम्यान, वाडेगाव येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी पीडित महिलेविरुद्ध बदनामी केल्याची फिर्याद दिली आहे.

या पार्श्वभूमीवर पीडित महिला आज सांगोला तालुक्यातील जावळा येथे राहणारे श्रीकांत देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आली असता तिला हाकलून देण्यात आले. ‘तुमचा नवरा येथे राहात नाही, जिथे राहतो तिथे जावा,’ असे सांगत तिला हाकलून दिल्याने पीडित महिला सांगोला पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली. त्यानंतर तिथेच तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी सतर्कता बाळगत तिला ताब्यात घेऊन उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पीडित महिलेला सोलापूर येथे हलविण्यात आले आहे.

भाजपामुळे माझा संसार उद्ध्वस्त -
---------------------------------------------------------------------------------
पीडित महिलेने भाजपमधील वरिष्ठ नेत्यांसह शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माढय़ाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, युवा मोर्चातील गणेश पांडे दिवेकर, नील सोमय्या, अमित शेलार, दीपक ठाकूर, संतोष आव्हाड यांची नावे घेत माहिती दिली. माझा संसार होता. बीजेपीमुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला, असा आरोप तिने केला आहे.