भिमा पाटबंधारे विभागाच्या निष्क्रीयतेमुळे पुन्हा हजारो लिटर पाणी वाया
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
मंगळवेढा (पंढरी नगरी न्यूज) : उजनी धरणातून मंगळवेढ्यात कॅनॉलव्दारे सोडलेले पाणी भिमा पाटबंधारे विभागाच्या निष्क्रीयतेमुळे ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाणी वितरीका क्रमांक ५ मधून काळ्या शिवारात गेल्याने हे पाणी पाहून त्यांच्या कामकाजाबाबत नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याकामी लक्ष घालून बेफिकीर कामकाज करणार्या अधिकार्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
उजनी धरणातून एप्रिल महिन्यात मंगळवेढ्यासाठी कॅनॉलव्दारे पाणी सोडले होते. वितरीका क्रमांक ५ मंगळवेढा-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गामधून गेल्याने येथील कामकाज व्यवस्थित न झाल्यामुळे पाणी रोडच्या पलिकडे न जाता अलिकडच्या बाजूला कॅनॉल फुटून हजारो लिटर पाणी काळ्या शिवारात सर्वत्र पसरल्याचे चित्र आहे. याबाबत प्रसारमाध्यमांतून वृत्त प्रसिध्द होवूनही भिमा पाटबंधारे विभागातील अधिकार्यांना कॅनॉल दुरुस्ती करुन घेण्याचा शहाणपणा न सुचल्यामुळे मागील दोन दिवसापुर्वी कॅनॉलव्दारे सोडण्यात आलेले पाणी कॅनॉलचे काम दुरुस्त न केल्यामुळे पुन्हा काळ्या शिवारात हायवे लगत पसरल्याचे चित्र आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सोलापूर शहरालाही आठ दिवसातून एकदा पाणी येत असल्याने पाणी टंचाईची भिषणता असतानाही येथील पाटबंधारे विभागाच्या निष्क्रीय अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेल्याने येथील कामकाजावर नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
सध्यस्थितीला उजनी मायनसमध्ये असून भविष्यात पावसावर उजनीची भिस्त अवलंबून आहे. भिमा नदी कोरडी पडल्याने नदीकाठावरील गावावर पाण्याची टांगती तलवार झाली असताना येथील अधिकार्यांच्या बेफिकीर वागणूकीचा फटका बसत आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या कामी लक्ष घालून अशा कामचुकार अधिकारी व कर्मचार्यावर कारवाई करावी अशी मागणी काळ्या शिवारातील वाया जाणारे पाणी पाहून करीत आहेत.