श्री. विठ्ठल - रूक्मिणी सभामंडपातील ऐतिहासिक चित्रे सुरक्षित ठिकाणी जतन..... मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी ,- राजेंद्र शेळके
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर, (दै पंढरी नगरी न्यूज) : श्री विठ्ठल- रूक्मिणी मंदिर व परिवार देवतांच्या मंदिरांचा जतन, संवर्धन व जिर्णोद्धाराची कामे शासनाच्या निधीतून पुरातत्व विभागामार्फत माहे डिसेंबर 2023 पासून हाती घेण्यात आलेली आहेत. मंजूर आराखड्यानुसार कामे टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात विठ्ठल गाभारा, रूक्मिणी गाभारा, बाजीराव पडसाळी तसेच विठ्ठल सभामंडप येथील जतन व दुरुस्तीची कामे पूर्णत्वास आली आहेत.
सध्या श्री रूक्मिणी सभामंडप तसेच इतर अनुषंगिक भागांमध्ये जतन व संवर्धनाची कामे सुरू आहेत. श्री रूक्मिणी सभामंडपामध्ये श्री रूक्मिणी स्वयंवराची ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेली चित्रे पूर्वी स्थापित करण्यात आलेली होती. तथापि, सभामंडपातील संरचनात्मक दुरुस्ती व संवर्धनाची कामे सुरू असताना चित्रांचे कोणतेही नुकसान होऊ नये, तसेच त्यांची मूळ अवस्था सुरक्षित राहावी यासाठी संबंधित चित्रे तात्पुरत्या स्वरूपात काळजीपूर्वक काढून सुरक्षित स्थळी संरक्षित करून ठेवण्यात आली आहेत. चित्रांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देऊन, सभामंडपातील कामे पूर्ण झाल्यानंतर सदरची ऐतिहासिक चित्रे मूळ ठिकाणी पूर्ववत पद्धतीने पुन्हा स्थापित करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.