श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिरे समितीकडून पंढरपूर माघ यात्रा : वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर प्रशासन सज्ज- गहिनीनाथ महाराज औसेकर. सुलभ व जलद दर्शनाला प्राधान्य, दर्शन रांगेत भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध; पत्राशेड येथे अन्नछत्र

श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिरे समितीकडून पंढरपूर माघ यात्रा :   वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर प्रशासन सज्ज- गहिनीनाथ महाराज औसेकर.   सुलभ व जलद दर्शनाला प्राधान्य, दर्शन रांगेत भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध; पत्राशेड येथे अन्नछत्र

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) :- माघ एकादशी मुख्य सोहळा दि. 08 फेब्रुवारी रोजी असून, यात्रा कालावधी दि.02 ते 12 फेब्रुवारी असा आहे. या यात्रेला सुमारे 4 ते 5 लाख भविक पंढरपूरात येतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा मंदिर समितीच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

माघी यात्रा कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनरांगेत बॅरीकेटींग करून त्यावर ताडपत्री शेड, जादा पत्राशेडची निर्मिती, आपत्कालीन मार्ग, विश्रांती कक्ष, दर्शन रांगेत बसण्याची सुविधा, लाईव्ह दर्शन, कुलर-फॅन, मिनरल वॉटर, चहा – खिचडी आदी सुविधा उपलब्ध राहणार आहेत. यात्रेनिमित्त भाविकांची होणारी गर्दी विचारात घेता, त्यांना सुलभ व जलद दर्शनासाठी प्राधान्य देण्यात येणार असून, त्यासाठी पुजांची संख्या कमी करून स.6.00 ते रा.12.00 पर्यंत दर्शन उपलब्ध राहणार आहे. दर्शनरांग जलद व द्रुतगतीने चालविण्यासाठी अनुभवी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच या यात्रा कालावधीत श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या परंपरांचे कटाक्षपणे पालन करण्यात येणार असून, त्याबाबतचे आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ह.भ.प. वासकर महाराज यांच्या दिंडीची नवमीला श्री.विठ्ठल सभामंडप येथे आरती व अभंग, ह.भ.प.आजरेकर महाराज पंढरपूर यांचा द्वादशीला नैवेद्य, त्रयोदशीला ह.भ.प.औसेकर महाराज यांच्या चक्रीभजनाची परंपरा असून, एकादशीला पहाटे श्रींची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य महोदयांच्या शुभहस्ते सपत्नीक संपन्न होत आहे. याशिवाय, सोलापूर महानगरपालिका यांचेकडील रेस्क्यू व्हॅन प्रशिक्षित कर्मचा-यांसह, सिझफायर यंत्रणा, अत्याधुनिक 100 सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासाठी कंट्रोल रूम, वायरलेस यंत्रणा, जनरेटर, मेटल डिटेक्टर, मोबाईल लॉकर, चप्पल स्टँड, सार्वजनिक प्रसारण सुचना प्रणाली, चौकशी कक्ष, बँग स्कॅनर मशिन, अपघात विमा पॉलीसी आदी व्यवस्था करण्यात आली आहे.

भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पत्राशेड येथे तालुका आरोग्य विभागाचा वैद्यकीय कक्ष, उपजिल्हा रूग्णालया मार्फत दर्शनमंडप येथे आयसीयू तसेच माळवदावर वैष्णव चॅरीटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्याकडून मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध राहणार आहे. मंदिर परिसरात वैद्यकीय पथकासह दोन अद्यावत रूग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. तसेच मयत भाविकांचे त्याच्या मुळगावी शव पोहोच करण्यासाठी मोफत शववाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठी विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले असून, मंदिर, दर्शनमंडप, तुकाराम भवन येथील स्वच्छता मंदिर कर्मचा-यांमार्फत व नगरप्रदक्षिणा, दर्शनरांग, मंदिर प्रदक्षिणा इ. ठिकाणची स्वच्छता आऊटसोर्सिंग पध्दतीने करण्यात येत आहेत. या कामी स्वयंसेवी संस्थाची मदत घेण्यात येत आहे.

श्री.संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामध्ये दु.12.00 ते 2.00 व रा.7.00 ते 9.00 या वेळेत अन्नदान सुरू राहणार असून, दर्शनरांगेत नवमीपासून चहा-शाबुदाणा, तांदळाची खिचडी तसेच पत्राशेड येथे दशमी, एकादशी व द्वादशीला अन्नछत्र सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मंदिर समितीचे संकेतस्थळ (www.vitthalrukminimandir.org), मोबाईल अॅप (‘‘श्री.विठ्ठल रूक्मिणी देवस्थान, पंढरपूर’’) वरून श्रीचे लाईव्ह दर्शन उपलब्ध असून पत्राशेड दर्शन रांग व मंदिर परिसरात एल.ई.डी. स्क्रिन बसविण्यात येत आहे. याशिवाय, देणगी घेण्यासाठी जादा स्टॉलची निर्मिती, ऑनलाईन देणगीसाठी QR CODE, RTGS, सोने-चांदी वस्तु दान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष तसेच महिला भाविकांच्या सोईसाठी सॅनिटरी नॅपकीन, हिरकणी कक्ष, चेंजिंग रूम तसेच श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी लाडूप्रसाद व त्यासाठी जादा स्टॉलची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच वेदांता, व्हीडीओकॉन व श्री.विठ्ठल रूक्मिणी या 3 भक्तनिवासामधील 361 रूममध्ये सुमारे 1600 भाविकांची निवास व्यवस्था करण्यात येत आहे. 

सदर यात्रा निर्विघ्नपणे - सुरळीत पार पाडण्यासाठी व वारकरी भाविकांना केंद्र बिंदू मानून त्यांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मंदिर समितीचे सदस्य सर्वश्री आ.रामचंद्र कदम, शकुंतलाताई नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ॲड.माधवीताई निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प.शिवाजीराव मोरे परिश्रम घेत असून सुमारे 1800 कर्मचारी व स्वयंसेवक सेवा पार पाडणार असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी दिली.