राज्यातील तीन भ्रष्ट माजी शिक्षणाधिकाऱ्यांची १० कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त
-----------------------------------------------------------------------------------
सोलापूर (पंढरी नगरी न्यूज ) पदाचा गैरवापर करून गैरमार्गाने कोट्यवधी रुपयांची 'माया' जमवणाऱ्या राज्यातील तीन तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांची सुमारे १० कोटींची बेहिशेबी संपत्ती 'एसीबी'ने जप्त केली. टीईटी घोटाळ्यात अडकलेले पुण्याचे माजी शिक्षणाधिकारी तुकाराम सुपे ३ कोटी ३९ लाखांची, सोलापूरचे लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासह कुुटुंबीयांकडे ५ कोटी ८५ लाखांची तर सांगलीचे लाचखोर शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांच्याकडील ८२ लाखांची बेहिशेबी संपत्ती जप्त करण्यात आली.शिक्षक भरती घोटाळ्यात अडकलेले पुण्याचे शिक्षणाधिकारी तुकाराम नामदेव सुपे (५९) यांच्या १९८६ ते २०२१ दरम्यानच्या मालमत्तेची एसीबीने चौकशी केली. त्यात २ काेटी ८७ लाख ९९ हजार ५९० रुपये राेख, ७२ लाख रुपये किमतीचे १४५ ताेळे साेने अशी ३ काेटी ५९ लाख ९९ हजार ५९० रुपये किमतीची बेकायदेशीर संपत्ती असल्याचे दिसून आले. २०२१ मध्ये त्यांच्यावर पुणे सायबर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल अाहे. १७ डिसेंबर २०२१ राेजी त्यांना अटकही झाली होती. म्हाडा पेपर फुटीतील मुख्य आराेपी डाॅ. प्रीतीश देशमुख याच्या घरी टीईटी परीक्षेच्या विद्यार्थ्यांची ओळखपत्रे सापडली. त्याच्याकडूनही २ काेटी ३४ लाख रुपये आणि ६५ लाख रुपयांचे साेन्याचे दागिने जप्त केले हाेते.
शालार्थ आयडी प्रस्तावासंदर्भात दाखल प्रस्ताव मंजुरीसाठी नोव्हेंबरमध्ये लाच घेताना अडकलेले सोलापूरचे तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासह पत्नी व मुलाकडे ५ काेटी ८५ लाख ८५ हजारांची बेकायदा मालमत्ता आढळली. ग्लाेबल टीचर रणजित डिसले यांच्या रजा प्रकरणावरूनही लोहार वादग्रस्त ठरले होते. त्यांच्या कोल्हापुरातील मालमत्तेची चौकशीही करण्यात आली. किरण लोहारसह पत्नी सुजाता, मुलगा निखिल (सर्व राहणार पाचगाव, ता. करवीर) यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
सांगली येथील शिक्षणाधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे यास लाच घेताना अटक करण्यात आली होती. एसीबीने जून १९८६ ते ६ मे २०२२ दरम्यान त्यांचे प्रत्यक्ष उत्पन्न व जमवलेल्या संपत्तीची चौकशी केली असता कांबळे दांपत्याच्या नावावर ८२ लाखांची अपसंपदा असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी विष्णू यांच्यासह त्यांच्या पत्नी जयश्रीवर ही (रा. बार्शी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.