संजय गांधी निराधार मधील सर्व योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान आता डीबीटी प्रणालीद्वारे खात्यात :- तहसीलदार सचिन लंगुटे यांची माहिती
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर ( दै पंढरी नगरी न्यूज ) : केंद्र व राज्य शासनाकडून राज्यातील संजय गांधी निराधार व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान दरमहा लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. तथापि त्यामध्ये आता शासन पातळीवरून बदल करून ते अनुदान थेट लाभार्थ्यांना डीबीटी प्रणालीद्वारे दिले जाणार असल्याने पंढरपूर तालुक्यातील या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार व मोबाईल संलग्न करण्याचे आदेश दिले आहेत.योजनेच्या तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांनी या कामाची पूर्तता करावी, अशी माहिती तहसीलदार तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली. केंद्र व राज्य शासनाकडून राज्यातील या योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा अनुदान दिले जाते. पंढरपूर तालुक्यात व शहरी असे दहा हजारांवर लाभार्थी असून, आजपर्यंत हे अनुदान देताना ते थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जात होते.

आता त्यामध्ये बदल करण्यात आला असून, अनुदान घेत असलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांच्या सध्याच्या बँक खात्याशी आधार व मोबाईल संलग्न करणे बंधनकारक केले असल्याने त्याची पूर्तता लाभार्थ्यांनी तत्काळ करणे आवश्यक आहे. कारण ती प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्येक लाभार्थ्यांची ईकेवायसी करायची असून, तालुक्यातील या योजनेतील एकही लाभार्थी वंचित राहू नये म्हणून सर्वांनी त्याची गांभीर्याने दाखल घ्यायची आहे. जे लाभार्थी याकडे दुर्लक्ष करती, त्यांचे दरमहा मिळणारे अनुदान शासन निर्णयानुसार आपोआप बंद होऊ शकते.
लाभार्थ्यानी लवकरात लवकर या कामाची पूर्तता करावी, आपले दरमहा येणारे अनुदान बंद होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केले .