हरियाणात माजी आमदाराची गाडीत गोळ्या झाडून हत्या , मात्र ड्रायव्हरला सोडलं;
---------------------------------------------------------------------------------
मुंबई( पंढरी नगरी न्यूज ) इंडियन नॅशनल लोकदल या पक्षाचे हरियाणा राज्याचे प्रमुख आणि माजी आमदार नफेसिंह राठी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना म्हणजे एक नियोजनबद्ध कट होता आणि हल्लेखोरांनी त्याची अंमलबजावणी केली.झज्जर जिल्ह्यात त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. एका एसयूव्हीमधून ते कुठे तरी जात असताना संध्याकाळच्या वेळेत त्यांच्यावर हल्ला झाला. हल्लेखोरांनी नफेसिंह यांच्यावर गोळी झाडली; मात्र त्यांच्या ड्रायव्हरला मात्र त्यांनी जिवंत सोडलं. त्याच्यावर गोळी झाडली नाही.
अशी माहिती मिळत आहे, की पाच हल्लेखोरांनी नफेसिंह यांच्यावर गोळी झाडल्यानंतर त्यांच्या ड्रायव्हरला सांगितलं, की 'तुला आम्ही जिवंत सोडत आहोत. यांच्या घरी जाऊन माहिती दे.' नफेसिंह राठी यांचा भाचा राकेश ऊर्फ संजय हा गाडीचालक होता. त्याच्या जबाबानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याचं त्याने आपल्या जबाबात सांगितलं.
नफेसिंह राठी हत्येप्रकरणी माजी आमदार नरेश कौशिक यांच्यासह सात जण आणि आणखी काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. गाडीचालक राकेश ऊर्फ संजय याच्या जबाबाच्या आधारे माजी आमदार नरेश कौशिक, माजी चेअरमन आणि विद्यमान चेअरपर्सन सरोज राठी यांचे पती रमेश राठी आणि चुलत सासरे कर्मवीर राठी, दीर कमल राठी, माजी मंत्री मांगेराम राठी यांचे पुत्र सतीश राठी, नातू गौरव आणि राहुल आणि अन्य पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बहादूरगडच्या लाइनपार पोलीस ठाण्यात 26 फेब्रुवारी 2024 रोजी आयपीसीच्या कलम 147, 148, 149, 307, 302, 120 बी, 25-27-54-59 आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या हत्याकांडामुळे सर्वांनाच धक्का बसला असून, त्यामागे नेमकं काय कारण असावं, याचे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पोलीसह विविध पैलूंचा तपास करत आहेत.